पाळधी-तरसोद सेवा रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
GPS मित्र परिवाराचे NHAI ला निवेदन; १५ ऑगस्टपर्यंत उपाययोजना न झाल्यास ‘रस्ता रोको’ आंदोलनाचा इशारा
पाळधी, ता. धरणगाव : पाळधी ते तरसोद या सेवा रस्त्यावर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर सेवा रस्त्यावर आवश्यक सुरक्षाविषयक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी GPS मित्र परिवार, पाळधी यांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) जळगाव कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पाळधी-तळसोड सेवा रस्त्यावर गेल्या काही वर्षांत अनेक गंभीर अपघात घडले असून, त्यात अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षाव्यवस्था बळकट करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
GPS मित्र परिवाराने निवेदनातून तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये संपूर्ण सेवा रस्त्यावर रात्रीच्या वेळी पुरेशी स्ट्रीट लाईट व्यवस्था उभारणे, साई मंदिर व गणपती मंदिर परिसरात सुरक्षित क्रॉसिंग (ओपन ॲक्सेस) उपलब्ध करून देणे तसेच संबंधित टोल नाक्यावर रुग्णवाहिका, क्रेन व इतर आपत्कालीन मदत सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध ठेवण्याचा समावेश आहे.
सध्या सुरक्षित क्रॉसिंग नसल्यामुळे नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी अनेक किलोमीटरचा वळसा घालावा लागत असून, त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत आहे. तसेच आपत्कालीन सुविधा तातडीने उपलब्ध नसल्यामुळे अपघातग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नसल्याची खंतही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
या सर्व मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यास पाळधी ग्रामस्थांच्या वतीने ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा GPS मित्र परिवाराने दिला आहे.
सदर निवेदन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांना सादर करण्यात आले असून, त्याच्या प्रती धरणगाव पोलिस ठाणे, दुचाकी पोलीस चौकी (पाळधी) तसेच हायवे ट्रॅफिक विभागाला देण्यात आल्या आहेत.



