जळगाव : प्रतिनिधी
समाजसेवा, आरोग्य आणि रक्तदान क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे मुकुंद गोसावी यांची रक्तदान जनजागृतीसाठी आरोग्य विभागाच्या ब्रँड अॅम्बेसडर म्हणून निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
उन्हाळ्यात रक्तदानाचा तुटवडा भासतो, अशावेळी थॅलेसेमिया, हिमोपिलिया रुग्णांसह गर्भवती महिलांना सतत रक्ताची गरज भासते. याच पार्श्वभूमीवर मुकुंद गोसावी यांनी ‘मिशन सिंदूर’ उपक्रमातून रक्त संकलन व प्रबोधन यामार्फत आरोग्य विभागाला मोठे योगदान दिले आहे. मुकुंद गोसावी यांनी आतापर्यंत १०० पेक्षा अधिक वेळा रक्तदान करून इतरांना प्रेरणा दिली असून, त्यांनी स्वतः रक्तदान शिबिरांचे आयोजनही केले आहे. शहरासह ग्रामीण भागातही रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
कोरोना काळात त्यांनी मोफत रुग्णवाहिका व मोटरसायकल सेवेतून जीव धोक्यात घालून रुग्णांना मदत केली होती, याचीही विशेष दखल घेण्यात आली. याच निस्वार्थ कार्यामुळे त्यांची निवड “स्टार प्रचारक” म्हणून करण्यात आली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील सामाजिक व आरोग्य सेवकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, मुकुंद गोसावी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.