विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 18 जून 2026 रोजी मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. विशेष म्हणजे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या नागपूर मतदारसंघासाठी पोटनिवडणूकही होणार आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेतील रिक्त जागा भरल्या जाणार असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रतिष्ठेची लढत रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोन अडीच वर्षांपासून अनेक जागा रिक्त
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे अनेक मतदारसंघातील विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपला तरी निवडणुका घेता आल्या नव्हत्या. परिणामी गेल्या दोन अडीच वर्षांपासून अनेक जागा रिक्त होत्या.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार संबंधित मतदारसंघातील किमान 75 टक्के मतदारसंख्या अस्तित्वात असल्यास निवडणूक घेता येते. आता आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने अखेर कार्यक्रम जाहीर केला आहे.
विधान परिषद निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना – 25 मे 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख – 1 जून 2026
उमेदवारी अर्जांची छाननी – 2 जून 2026
अर्ज माघारीची अंतिम मुदत – 4 जून 2026
मतदान – 18 जून 2026 (सकाळी 8 ते दुपारी 4)
मतमोजणी – 22 जून 2026
कोणत्या मतदारसंघात होणार निवडणूक?
या निवडणुकीत राज्यातील पुढील 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांचा समावेश आहे
सोलापूर
अहिल्यानगर
ठाणे
जळगाव
सांगली-सातारा
नांदेड
यवतमाळ
पुणे
भंडारा-गोंदिया
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
नाशिक
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
अमरावती
धाराशिव-लातूर-बीड
परभणी-हिंगोली
छत्रपती संभाजीनगर-जालना
नागपूर
विधान परिषद सदस्य कसे निवडले जातात?
महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या 78 आहे. त्यामध्ये सदस्यांची निवड विविध मार्गांनी केली जाते.
78 सदस्यांपैकी :
30 सदस्य – आमदारांकडून निवडले जातात
22 सदस्य – स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून
7 सदस्य – पदवीधर मतदारसंघातून
7 सदस्य – शिक्षक मतदारसंघातून
12 सदस्य – राज्यपाल नियुक्त करतात
विधानसभेतील सध्याचे संख्याबळ
महायुती
भाजपा – 131
शिवसेना (शिंदे गट) – 57
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 40
जनसुराज्य शक्ती – 2
राष्ट्रीय समाज पक्ष – 1
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी – 1
अपक्ष समर्थक – 2
एकूण : 234
महाविकास आघाडी
काँग्रेस – 16
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 10
शिवसेना (ठाकरे गट) – 20
समाजवादी पार्टी – 2
पीडब्ल्यूपीआय – 1
एकूण : 49
इतर
एमआयएम – 1
सीपीआय (एम) – 1
राजर्षी शाहू विकास आघाडी – 1
एकूण : 3
कोणाचे पारडे जड?
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचेही वेगवेगळ्या जिल्ह्यांत मजबूत नेटवर्क आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी बंडखोरी, क्रॉस व्होटिंग आणि अपक्षांची भूमिका निर्णायक ठरू शकते.
विशेषतः जळगाव, नाशिक, ठाणे, पुणे आणि नागपूर या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच लॉबिंग आणि संपर्क मोहीम सुरू केली आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी राजकीय धुरळा
विधान परिषद निवडणुकांमुळे पावसाळी अधिवेशनाआधीच राज्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आपले वर्चस्व कायम ठेवण्याच्या तयारीत आहे, तर महाविकास आघाडीही जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसत आहे.
आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कोणाचा राजकीय गेम होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



