धरणगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातून गुरुजींच्या पवित्र नात्याला आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अवघ्या १० वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच शिक्षकाने गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नराधम शिक्षक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. संशयित आरोपी शिक्षक नंदलाल मराठे हा रोज सकाळी शाळा भरण्यापूर्वी १० वाजता तिला झाडू मारण्याच्या बहाण्याने वर्गात बोलावून घेत असे. शाळा रिकामी असल्याचा गैरफायदा घेऊन तो तिच्यावर अत्याचार करायचा. इतकेच नव्हे तर, तो तिला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषण करत असे. या क्रूर कृत्याला विरोध केल्यास तो चिमुरडीला बेदम मारहाण करायचा आणि ‘कोणाला सांगितले तर तुझे आई-वडील मरून जातील’, अशी भीती दाखवून तिला गप्प बसवायचा. ३० एप्रिल २०२६ रोजी शाळेच्या शेवटच्या दिवशीही त्याने या चिमुरडीला आपल्या वासनेची शिकार बनवले.
उन्हाळ्याच्या सुट्टीत ही मुलगी आपल्या मावशीकडे गेली असता, तिथे तिची तब्येत खालावली आणि तिने जेवण करणे बंद केले. नातेवाईकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने रडत रडत आपल्यासोबत घडलेला हा भयानक प्रसंग सांगितला. यानंतर मुलीच्या आईने तातडीने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध कठोर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, या विकृत शिक्षकाला कठोर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.



