जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कुसुंबा गावातील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या आवारात जुन्या भांडणाच्या कारणावरून सुप्रीम कॉलनीत राहणाऱ्या एका मुलाला मारहाण करून धारदार वस्तूने वार करीत जखमी केले. ही घटना गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात सुनिता अशोक जाधव (वय ४५) या महिला वास्तव्याला आहे. दरम्यान त्या कुसुंबा गावातील शाळेत महिलेचा मुलगा लक्ष्मण अशोक जाधव हा शिकत आहे. गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.१५ वाजता शाळा सुटल्यानंतर लक्ष्मण हा घरी जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी शाळेच्या आवारात जुन्या भांडणाच्या कारणावरून कुसुंबा गावात राहणारा वैभव रवींद्र ठाकूर यांनी शिवीगाळ करत जिवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच मारहाण करून चाकू सारख्या धारदार वस्तूने उजव्या पायावर वार करून गंभीर दुखापत केली आहे. या संदर्भात सुनिता जाधव यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सायंकाळी वैभव रवींद्र ठाकूर रा. कुसुंबा ता. जळगाव यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद पाटील करीत आहे.