चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील चुंचाळे येथे कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांना फसवणूक करणाऱ्या बेकायदेशीर बियाणे विक्रीवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा आहे.
शहर पोलीस स्टेशन चोपडा यांना दि. २० एप्रिल रोजी मिळालेल्या माहितीनुसार, नितीन नंदलाल चौधरी हा व्यक्ती छुप्या पद्धतीने प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची विक्री करत असल्याचा संशय होता. यावर कृषी विभागाने तपासणी केली असता तब्बल ४५० पॅकेट बियाणे सापडले. कारवाईदरम्यान ‘रिसर्च हायब्रीड कॉटन सीड सुपर किंग’ व ‘चॅलेंजर’ या नावाची प्रतिबंधित बियाण्यांची ९ पोती जप्त करण्यात आली. त्यांची अंदाजे किंमत ५ लाख ४० हजाररुपये आहे. या प्रकणी आरोपी नितीन नंदलाल चौधरी (रा. चुंचाळे, ता. चोपडा, जि. जळगाव) यास अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई चोपडा तालुका गुणवत्ता नियंत्रण आर. एम. पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी योगिनी सोनवणे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पो. हे. कॉ. पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे यावेळी उपस्थित होते. आर. एम. पाटील यांच्या तक्रारीवरून चोपडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



