जळगाव : प्रतिनिधी
खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देऊ नये, यासाठी न्यू बी. जे. मार्केटसमोरील चांदेलकर प्लाझाधील सोशल क्लबमध्ये अरुण भीमराव गोसावी (रा. तुकारामवाडी) यांच्यावर टोळक्याने हल्ला करून साहित्याची तोडफोड केली. तसेच हा क्लब चालवायचा असेल तर आम्हाला दर महिन्याला पैसे द्यावे लागतील, असे म्हणत गल्ल्यातील आठ हजारांची रोकड जबरीने काढून नेली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अरुण गोसावी हे चांदेलकर प्लाझा येथील वरच्या मजल्यावर नशिराबाद स्पोर्टस फाउंडेशन या सोशल क्लबमध्ये पार्टनर आहे. गुरुवारी रात्री तेथे १५ जणांचे टोळके हातात लाठ्या-काठ्या घेऊन आले. गोसावी यांना शिवीगाळ करीत आमच्याविरुद्ध केस चालवू नको सांगितले तरी समजत नाही. आज त्याचा मर्डर करून टाकू, तुम्ही सोशल क्लब कसा चालवता, आम्हाला पैसे द्यावे लागतील, असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भागीदार ब्रिजलाल वालेचा हे त्यांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांनादेखील धक्काबुक्की करून ठार मारण्याची धमकी दिली. मारहाण केल्यानंतर टोळक्याने गल्ल्यातील आठ हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेत क्लबमधील साहित्याची तोडफोड करीत नुकसान केले. अपार्टमेंटच्या खाली दुचाकींचीदेखील या टोळक्याने तोडफोड करून ते पसार झाले. या प्रकरणी गोसावी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.