

जळगाव : प्रतिनिधी
कुटुंबीय देवदर्शनासाठी गेलेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून ४५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या ३ मूर्तीसह लॅपटॉप असा एकूण ६५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. १६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी दि. २३ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी परिसरातील डी ११० सेक्टरमधील रहिवासी सम्राट अविनाश शर्मा (वय ४५) हे कुटुंबासह दि. ९ नोव्हेंबर रोजी देवदर्शनासाठी गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, प्रत्येकी १५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या ३ मूर्ती असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. कुटुंबीय बाहेरगावी असताना त्यांचे नातेवाईक घराकडे गेले त्या वेळी घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी लागलीच या विषयी सम्राट शर्मा यांना माहिती दिली. देवदर्शनाला गेलेले सम्राट शर्मा हे घरी आल्यानंतर त्यांनी दि. २३ रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों किरण चौधरी करत आहेत.
ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. तोंडाला मास्क लावून आलेले दोन जण फुटेजमध्ये दिसत आहेत. या शिवाय बाहेरील आजूबाजूचे फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.



