
चाळीसगाव : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसचा कन्नड घाटात स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटल्याने बसचे नियंत्रण सुटल्याची थरारक घटना रविवारी (दि. २३ ऑगस्ट) सकाळी घडली. नियंत्रण सुटलेली बस घाटातील कठड्याला अडकून थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. या बसमध्ये तब्बल ५९ प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवाशांचा जीव बचावला असून, चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस क्रमांक एमएच ४० एन ९७२६ ही छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे प्रवाशांना घेऊन जात होती. कन्नड घाटातून बस जात असताना अचानक स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस अचानक अनियंत्रित झाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, बस घाटातील कठड्याला अडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला. बस कठड्यापलीकडे जाऊन खोल दरीत कोसळली असती, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे सुदैवाने ५९ प्रवाशांचा जीव वाचला. या घटनेत चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदतकार्य करण्यात आले. या घटनेमुळे कन्नड घाट परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. दरम्यान, एसटी बसच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटण्यामागील नेमके कारण काय, बसची यापूर्वी तांत्रिक तपासणी झाली होती का आणि वाहन रस्त्यावर सोडण्यापूर्वी आवश्यक तपासणी करण्यात आली होती का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. सुदैवाने यावेळी मोठी जीवितहानी टळली असली तरी अशा तांत्रिक त्रुटींकडे एसटी प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.



