
यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील किनगाव या गावात हॉटेल जत्राच्या मागे असलेल्या एका गुरांच्या गोठयात २३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी घडली असून, त्याला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुण हा आडगाव (ता. यावल) येथील रहिवाशी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव ता. यावल या गावात हॉटेल जत्रा आहे. या हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या गुरांच्या गोठयात गणेश हाजी बारेला (वय २३ रा. आडगाव ता. यावल) या तरुणाने विषारी द्रव्य प्राशन केले होते. हा तरुण बेशुद्ध अवस्थेत तेथे आढळला त्याच्या तोंडातून फेस येत होता. तेव्हा तातडीने त्याला तेथून ग्रामीण रुग्णालय यावल येथे आणण्यात आले. ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हाजी नानसिंग बारेला यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार संदीप सूर्यवंशी करीत आहेत.



