सतखेडा गावच्या भगवान नन्नवरे यांना वकिलीची सनद
सतखेडा येथील कष्टकरी कुटुंबातील भगवान अंकुश नन्नवरे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण करून वकिलीची सनद मिळवली आहे. मुंबई कोर्टात वकील म्हणून ते आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत.
भगवान नन्नवरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरणास्थान मानून शिक्षण आणि संघर्षाचा मार्ग स्वीकारला. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर शिक्षण पूर्ण केले.
त्यांचे वडील अंकुश नाना यांनी हातमजुरी व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. कष्टकरी कुटुंबातून आलेल्या भगवान यांनी मिळवलेल्या या यशामुळे नन्नवरे कुटुंबासह सतखेडा ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भगवान नन्नवरे यांच्या यशाचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वकिलीच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या यशामुळे गावातील तरुणांसमोर शिक्षण, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवण्याचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.



