

जळगाव : प्रतिनिधी
दुपारच्या सुमारास लग्नसोहळ्यात वाद घालणाऱ्या प्रेम गोपाल धनगर (वय २३, रा. बोरणार, ता. जळगाव) या तरुणाला पाच जणांनी मारहाण करीत त्याच्या पाठीत चॉपर खूपसून त्याचा खून केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली. तसेच सायंकाळी तरुणावर बोरणार गावात अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बोरणार येथे राहणारा प्रेम धनगर हा आई वडीलांसह वास्तव्यास होता. दि. १८ रोजी सायंकाळी त्याचा आतेभाऊ सुनिल धनगर याच्याघराजवळील चौकात गेला. तेथे अनिस पटेल यांच्या मुलीच्या लग्नसमारंभाचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी प्रेम धनगर याने कार्यक्रमात जावून शिवीगाळ केली. त्यावेळी सुनिल धनगर यांनी त्याची समजूत काढून घरी नेले. परंतू काही वेळानंतर प्रेम धनगर हा पुन्हा तेथे गेला आणि त्याठिकाणी त्याचा पुन्हा वाद झाला. या वादात प्रेम धनगर याच्या पाठीत धारदार शस्त्राने वार करीत त्याची हत्या करण्यात आली. जो पर्यंत पोलीस मारेकऱ्यांना अटक करत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घेतली होती. लग्नसोहळ्यात तरुणाची हत्या झाल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी रात्री घटनास्थळी भेट देत मारेकऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
एलसीबीचे पथक तसेच एमआयडीसी गुन्हे शोध पथकाने संयुक्तपणे तपासाचे चक्रे फिरवित अनिस अजीज पटेल (वय ४५), आदील अजीज पटेल (वय ३२), सादीक मुर्शीद पटेल (वय २८, तिघ रा. बोरणार, ता. जळगाव), शोएब ईस्माईल पटेल (वय ३२, रा. नाचनखेडा, ता. जामनेर) व अश्पाक मेहमूद पटेल (वय २७, रा. यावल) यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. २५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. खूनाच्या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे रात्रीपासून गावात स्थानिक पोलिसांसह आरसीपीचे पथक दाखल होवून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी तरुणावर पोलिस बंदोबस्तात अंत्यंस्कार करण्यात आला.



