

जळगाव : प्रतिनिधी
येथील सुवर्ण बाजारात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या सोने-चांदीच्या दरघसरणीला आता ब्रेक लागला असून, नव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धातूंच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या सप्ताहात सोने १२ हजार ४२२, तर चांदी तब्बल २० हजार ६०० रुपयांनी स्वस्त झाली होती. मात्र, शनिवारपासून सुरू झालेली दरवाढ सोमवारीही कायम राहिल्याने बाजाराला पुन्हा दर वाढीचा झटका बसला आहे.
गेल्या शनिवारी सोन्याच्या दरात ५१५ रुपये, तर चांदीच्या दरात १ हजार ३० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली होती. त्यानंतर रविवारी बाजार बंद असल्याने व्यवहार झाले नाहीत. सोमवारी सकाळी बाजार सुरू होताच शनिवारच्या तुलनेत दोन्ही धातूंच्या दरात पुन्हा वाढ झाली. विशेष म्हणजे, दुपारनंतर दरवाढीचा वेग आणखी वाढला. सोमवारी बाजार बद होतांना शनिवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात ४ हजार १४१ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे येथील सुवर्ण बाजारात तीन टक्के जीएसटीसह सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम १ लाख ३२ हजार ४९९ रुपयांवर पोहोचला. तर चांदीच्या दरात ५ हजार १५० रुपयांची वाढ झाल्याने तीन टक्के जीएसटीसह चांदीचा दर प्रति किलो १ लाख ६३ हजार ७७७ रुपयांवर गेला. गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर आता दरांनी पुन्हा उसळी घेतल्याने सुवर्ण बाजारातील चढ-उतार कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात सोने-चांदीचे दर कोणत्या दिशेने वाटचाल करतात, याकडे ग्राहकांसह सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे



