

एक आवर्तन देण्यापेक्षा तीन आवर्तने द्या; ४५ दिवसांऐवजी २५ दिवसांचे आवर्तन करा! १५ लाख टन चारा उत्पादनाची क्षमता; आमरण उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना आठ दिवस थांबण्याचे आवाहन
लाईव्ह महाराष्ट्र न्युज जळगाव : खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून आता रब्बी हंगामासाठी सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गिरणा धरणात १०० टक्के पाणीसाठा असताना शेतकऱ्यांना केवळ एकच आवर्तन का दिले जात आहे? असा सवाल उपस्थित करत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी गिरणा, बहुळा आणि खडकदेवळा धरणातून किमान तीन आवर्तने सोडण्याची जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनाही तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
गिरणा धरणात २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी!
आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरणा धरणात सध्या जवळपास २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. यातील मृत पाणीसाठा सुमारे ३ हजार दशलक्ष घनफूट आहे. बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट लक्षात घेतली तरी सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकते. मात्र, सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाणीसाठ्याबाबत चुकीची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
४५ दिवसांऐवजी २५ दिवसांचे आवर्तन; तीन आवर्तनांचा पर्याय!
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत गिरणा धरणातून केवळ एक आवर्तन सोडण्याचा निर्णय झाल्याचे सांगत आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. एकच आवर्तन देण्यापेक्षा किमान तीन आवर्तने देणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या ४५ दिवसांचे आवर्तन देण्याऐवजी २५ दिवसांची तीन आवर्तने सोडण्याचा पर्याय त्यांनी सुचविला आहे. यामुळे १३५ दिवसांच्या नियोजनाऐवजी ७५ दिवसांत पाण्याचे नियोजन करता येईल. पाण्याची नासाडी टाळून अधिकाधिक शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
गिरणा पट्ट्यात १५ लाख टन चारा उत्पादनाची क्षमता!
राज्य सरकारकडून धरणांच्या परिसरात चारा उत्पादन घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले जात आहे. अशा परिस्थितीत गिरणा धरणात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध असताना तीन आवर्तने सोडल्यास गिरणा पट्ट्यात तब्बल १५ लाख टन चारा उत्पादन करण्याची क्षमता असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा मराठवाड्यालाही पुरवता येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळण्यासोबतच राज्यातील चारा टंचाईवर मात करण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बहुळा, खडकदेवळा आणि हिवरा धरणातूनही पाण्याची मागणी
गिरणा धरणाप्रमाणेच बहुळा आणि खडकदेवळा धरणांमध्येही १०० टक्के पाणीसाठा असल्याचे सांगत या धरणांतूनही सिंचनासाठी प्रत्येकी तीन आवर्तने सोडण्याची मागणी त्यांनी केली. हिवरा धरणातील पाण्याचेही योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
धरण परिसरातील खासगी शेतकऱ्यांच्या वीज जोडण्यांचा प्रश्न ऐरणीवर
धरणातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी मोटारी बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय योग्य असल्याचे आमदार पाटील यांनी मान्य केले. मात्र, या कारवाईदरम्यान धरण परिसरात खासगी जमीन घेऊन फळबागा उभारलेल्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक विहिरींच्या वीज जोडण्याही खंडित झाल्याने फळबाग उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
धरणातील मोटारी बंद ठेवाव्यात; मात्र खासगी शेतकऱ्यांच्या विहिरींच्या वीज जोडण्या सुरू ठेवण्याबाबत प्रशासनाने स्वतंत्र निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. येत्या दोन दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमरण उपोषण करू नका, आठ दिवस थांबा!
दरम्यान, गिरणा धरणातून सिंचनासाठी पुरेसे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी काही शेतकरी उद्यापासून आदरणीय बिर्लाजींच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळच येऊ नये, ही आपली पहिली अपेक्षा असल्याचे सांगत त्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.
आंदोलकांनी आठ दिवस वाट पाहावी. या कालावधीत शासनाकडून निर्णय झाला नाही, तर शेतकरी पुत्र आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आंदोलन करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र, सध्या आंदोलनाला बसण्याऐवजी शासनाला निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
एकीकडे गिरणा धरणातील पाण्याचे नियोजन, दुसरीकडे रब्बी हंगामातील सिंचनाचा प्रश्न आणि तिसरीकडे आमरण उपोषणाचा इशारा, अशा तिहेरी पेचात आता जलसंपदामंत्री गिरीश महाजन काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



