

जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जामनेर तालुक्यातील गोंदे गावात अवैध गावठी दारू तयार करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट व जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार अवैध दारू व्यवसायावर नियंत्रण मिळविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. फत्तेपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गोंदे गावात छापेमारी केली.
या कारवाईत सुमारे १ हजार लिटर कच्चे रसायन जागीच नष्ट करण्यात आले, तर ३० लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट व जप्त केला आहे. या प्रकरणी जाबीर हसन तडवी (३८), फकीरा रमेश तडवी (३७), हजराबाई युनूस तडवी (३४) आणि रहमान कासम तडवी (७१) या चार जणांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.



