

जळगाव : प्रतिनिधी
बीएचआर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या हजारो ठेवीदारांच्या वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना आता पुन्हा एकदा वाचा फोडण्यात आली आहे. ठेवीदारांचे अडकलेले पैसे व्याजासह परत मिळावेत, तसेच परताव्याची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, या प्रमुख मागण्यांसाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आज मुंबई येथे राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने सविस्तर निवेदन सादर केले.
बीएचआर मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये हजारो नागरिकांनी आयुष्यभराची जमापुंजी ठेवींच्या स्वरूपात जमा केली होती. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या ठेवी अडकून पडल्याने ठेवीदारांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि सामान्य ठेवीदारांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह परत मिळाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
अवसायकामार्फत आतापर्यंत करण्यात आलेल्या वसुलीचा आणि जमा झालेल्या निधीच्या वितरणाचा सविस्तर तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणीही करण्यात आली. ठेवीदारांना परतावा देण्याची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गंभीर आजारांनी ग्रस्त ठेवीदार आणि मृत ठेवीदारांच्या वारसांना प्राधान्याने मदत द्यावी, अशी भूमिका मांडण्यात आली.
याशिवाय ठेवीदारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.
आमदार सुरेश भोळे यांनी सहकारमंत्र्यांशी चर्चा करताना ठेवीदारांच्या आर्थिक अडचणी आणि त्यांच्या कुटुंबांवर ओढवलेल्या परिस्थितीची माहिती दिली. या प्रकरणात शासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, तसेच ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशांची परतफेड होणे आणि त्यांना न्याय मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी भूमिका आमदार भोळे यांनी मांडली.
आता सहकारमंत्र्यांच्या भेटीनंतर बीएचआर ठेवीदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासन स्तरावर कोणती पावले उचलली जातात आणि ठेवीदारांना त्यांच्या पैशांचा परतावा कधी मिळतो, याकडे हजारो ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.



