

जळगाव : प्रतिनिधी
क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे व भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य जनजागृतीचा संकल्प घेऊन धर्म जागरण संस्था, जळगाव व निरामय सेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ नोव्हेंबर रोजी जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर येथील हनुमान मंदिर परिसरात भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात नागरिकांना आरोग्य तपासणी व आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. समाजातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि वेळेवर आरोग्य तपासणीचे महत्त्व पटावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी 287 रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार सुरेश भोळे, अजित राणे, डॉ. स्वप्निल सोनवणे, डॉ. अंजली पाटील, डॉ. नेहा चौधरी, डॉ. लतीफ कोल्हे, तुषार पाटील, मनोज जंजाळ, पिंटू बारी, यशवंत कपडे, चंद्रकांत तायडे व बेबा सूर्यवंशी उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरासाठी जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे विशेष सहकार्य लाभले. महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.
महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेचा उपक्रम राबविण्यात आल्याने या आयोजनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सामाजिक संस्था आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून समाजहिताचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.



