Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आदिवासी क्रांतिकारकांचा शौर्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवू — पालकमंत्री गुलाबराव पाटील
    क्राईम

    आदिवासी क्रांतिकारकांचा शौर्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवू — पालकमंत्री गुलाबराव पाटील

    editor deskBy editor deskNovember 15, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, दि.१४ नोव्हेंबर (जिमाका) : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाने दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. भगवान बिरसा मुंडा आणि क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासह जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी मोठा संघर्ष केला. त्यांच्या त्यागाचा, शौर्याचा आणि स्वाभिमानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करतानाच शिक्षण, रोजगार आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

    जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त धरणगाव येथील क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक स्मारक परिसरात आयोजित स्वच्छता अभियान, दीपोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त संपूर्ण स्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे स्मारक परिसरात झालेला दीपोत्सव नेत्रदीपक ठरला.जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांच्या वतीने करण्यात आले होते.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. शिक्षणातूनच समाजाची खरी प्रगती साध्य होणार असल्याने विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण, उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळावे. ज्या आदिवासी वाड्या-वस्त्यांवर अद्याप पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही, तेथे नळ पाणीपुरवठा योजनांना प्राधान्याने मंजुरी देण्यात येईल. दुष्काळी पाड्यांमध्ये बोअरवेलचे सौरऊर्जीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. सन २०१९ मध्ये सहकार राज्यमंत्री असताना या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर २० जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या भव्य स्मारकाचे उद्घाटन झाले. आदिवासी समाजाच्या शौर्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या या स्मारकाच्या उभारणी व विकासात योगदान देता आल्याचे मनापासून समाधान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महापुरुषांच्या स्मारकांचे जतन करण्याबरोबरच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

    शिक्षणातूनच आदिवासी समाजाची खरी प्रगती – खासदार स्मिताताई वाघ
    यावेळी खासदार स्मिताताई वाघ म्हणाल्या की, भगवान बिरसा मुंडा आणि क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी दिलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. या महापुरुषांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती झाली पाहिजे. विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करून विविध क्षेत्रांत प्रगती साधावी. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची उन्नती करणे, हीच या क्रांतिकारकांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.

    जनजातीय गौरव दिन व्यापक स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन
    भगवान बिरसा मुंडा यांची जयंती व जनजातीय गौरव दिन १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाभर उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, लोककला, पारंपरिक संस्कृती आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावी. हा सप्ताह केवळ उत्सव न राहता आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प ठरावा, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.

    पथनाट्यातून क्रांतिकारकांच्या संघर्षाला उजाळा
    कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी जनजातीय गौरव सेवा सप्ताहातील विविध उपक्रमांची तसेच सेवा संकल्प अभियानाची सविस्तर माहिती दिली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागातील प्रा. योगेश माळी, वैशाली कोळी व गणेश अहिरे यांनी भगवान बिरसा मुंडा आणि क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांनी केले तर सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी आभार मानले.

    यांची होती उपस्थिती
    यावेळी खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा परिषदेचे माजी सभापती पी. सी. (आबा) पाटील, डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सविताताई सोनवणे, नगराध्यक्ष लीलाताई चौधरी, संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाषअण्णा पाटील, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अमोल जाधव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रवीण दाभाडे व पवन पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बालकांच्या हसण्यातच खरा आनंद; शासकीय रुग्णालयात बालदिनाचा उत्साह!

    November 15, 2026

    संघटना हीच शिवसेनेची खरी ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    November 15, 2026

    रिक्षाला धडक, जाब विचारताच मारहाण; जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्त वादात!

    November 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.