

जळगाव : प्रतिनिधी
रिक्षाला कारचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने रिक्षाचालक गजानन प्रभाकर भोपळे (वय ४०, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांना मारहाण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासन विभागाचे सह. आयुक्त जनार्दन पवार यांच्याविरुद्ध दि. १४ नोव्हेंबर रोजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुसुंबा येथील रिक्षा चालक गजानन भोपळे हे दि. ५ नोव्हेंबर रोजी (एमएच १९, सीडबल्यू ६५७४) क्रमांकाची रिक्षा घेवून जात होते. दरम्यान, शहरातील पोलन पेठ परिसरातील एका दुचाकीच्या दालनाजवळ प्रवाशांची वाट पाहत उभे असलेल्या रिक्षाला मागून येणाऱ्या (एमएच १९, डीएस ९८८९) क्रमांकाच्या कारचा धक्का लागला. रिक्षा चालकाने विचारपूस केल्यानंतर त्याचा राग आल्याने कारमधील नगर पालिका प्रशासन विभागाचे सह. आयुक्त जनार्दन पवार यांनी रिक्षा चालकाला शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मी तुला मारुन टाकेल अशी धमकी देखील दिली. या प्रकरणी गजानन भोपळे यांनी दि. १४ रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नगर पालिका प्रशासन विभागाचे सह आयुक्त जनार्दन पवार यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.



