

मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली आहे. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या स्वार्थासाठी भाजप छठ पूजेच्या माध्यमातून महाराष्ट्रात जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच, ‘भाजपला कामे दाखवून निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यामुळे दोन गटांत संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर ते निवडणुका जिंकतात,’ असा स्फोटक दावाही राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे.
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, भाजप आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया सध्या मुंबई आणि महाराष्ट्रात छठ पूजेचा मुद्दा वापरून संघर्ष कसा निर्माण होईल, यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी मनसेने बंद पाडली. पण तरीही भाजपला अपेक्षित असलेला संघर्ष उभा राहत नाहीये, याची त्यांना खंत आहे. हा सगळा आटापिटा आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी सुरू आहे. भाजपच्या ‘थिंक टँक’ची बौद्धिक क्षमता कमकुवत झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
राज ठाकरे म्हणाले, भाजपने देशाची आणि महाराष्ट्राची वाट लावली आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूंनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे. आपले महाराज आणि मावळे जिथे नांदले, तो सह्याद्रीही यांनी पोखरायला सुरुवात केली आहे. जंगले आणि जमिनी त्या उद्योगपतीला दिल्या जात आहेत.”
मराठी माणसाला सतर्कतेचा इशारा देताना राज ठाकरे म्हणाले, “माझी मराठी माणसांना विनंती आहे की, त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. भाजपच्या स्वार्थासाठी त्यांच्या सापळ्यात आपण अडकायचे नाही. आपण शिवरायांचा गनिमी कावा लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी आणि कसे उत्तर द्यायचे, हे आपण ठरवू. योग्य वेळी आपण आपला राग बाहेर काढला पाहिजे.”



