

भाजप १०, शिंदेसेना ७, अजित पवार राष्ट्रवादीला ४ जागा; मंगेश चव्हाण, सुमित पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह दिग्गजांचा समावेश
विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने आपली राजकीय रणनीती निश्चित केली असून २१ जागांसाठी उमेदवारांची यादी अंतिम झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप १०, शिवसेना शिंदे गट ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ४ असा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याचे समजते. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती असून ही संभाव्य अंतिम यादी लाईव्ह महाराष्ट्राच्या हाती लागली आहे.
जिल्हा बँकेच्या सत्तेच्या लढाईत यंदा जिल्ह्यातील मंत्री, आमदार, माजी मंत्री आणि सहकार क्षेत्रातील प्रभावी नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे उमेदवार निवडीमध्ये राजकीय ताकद, पक्षीय समतोल आणि स्थानिक समीकरणांचा विचार करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
विकास सोसायटी मतदारसंघातील उमेदवार
महायुतीच्या यादीत चाळीसगाव विकास सोसायटी मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण (भाजप), पाचोरा मतदारसंघातून सुमित पाटील (शिवसेना शिंदे गट), पारोळा मतदारसंघातून नलिनी पाटील, एरंडोलमधून मृणाल पाटील (शिवसेना शिंदे गट), अमळनेरमधून जयश्री अनिल पाटील, धरणगावमधून सोनल पवार, चोपड्यातून रोहित निकम (भाजप), जळगाव तालुका मतदारसंघातून पालकमंत्री गुलाबराव पाटील, भुसावळमधून रजनी सावकारे, जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन, बोदवडमधून हरीश पाटील (शिवसेना शिंदे गट), मुक्ताईनगरमधून रक्षा खडसे, रावेरमधून राजू ठेकेदार आणि यावलमधून विनोद पाटील यांच्या नावांचा समावेश आहे.
राखीव मतदारसंघांतही दिग्गजांना संधी
महिला राखीव मतदारसंघातून भाजपच्या जयश्री महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पद्माताई देशमुख यांची नावे निश्चित झाल्याचे समजते. इतर संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, तर ओबीसी मतदारसंघातून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना संधी देण्यात आल्याची माहिती आहे.
एसटी राखीव मतदारसंघातून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एनटी राखीव मतदारसंघात रावेरचे सुरेश धनके आणि चाळीसगावचे राजेंद्र राठोड या दोघांपैकी एकाच्या नावावर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीचा दहा-सात-चारचा फॉर्म्युला
जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी भाजपला १०, शिवसेना शिंदे गटाला ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ४ जागा असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. या माध्यमातून तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर प्रभाव असलेल्या नेत्यांना उमेदवारी देतानाच राजकीय घराण्यांनाही प्रतिनिधित्व देण्यात आल्याचे या यादीतून दिसून येते. सुमित पाटील यांच्या उमेदवारीपासून ते गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यासारख्या दिग्गजांच्या नावांपर्यंत अनेक राजकीय समीकरणे या निवडणुकीत केंद्रस्थानी आली आहेत.
महायुतीच्या या उमेदवार यादीवर वरिष्ठ नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती राजकीय वर्तुळातून मिळत आहे. आता अधिकृत घोषणा आणि उमेदवारी अर्जांच्या अंतिम प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी महायुतीने आखलेली ही रणनीती प्रत्यक्ष निवडणुकीत कशी उतरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



