
मुंबई : वृत्तसंस्था
“राज्याची राजधानी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार आणि हत्येचे सत्र सुरू आहे. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडल्या गेल्या, ठाण्यात राजकीय कार्यकर्ते प्रदीप पुर्णेकर यांची निर्घृण हत्या झाली आणि आता टायगर श्रॉफच्या गाडीवरही गोळीबार झाला. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून गुंड टोळ्या मोकाट सुटल्या आहेत. जनतेच्या जीविताचे रक्षण करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या राज्यात उघडपणे ‘जंगलराज’ सुरू असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्यपालांनी राज्यात तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करावी,” अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट शरसंधान साधले. तसेच सत्ताधाऱ्यांचा ‘रेझिम चेंज’ (सत्तापालट) केल्याशिवाय जनता शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
ठाण्यातील गुन्हेगारीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार करताना संजय राऊत म्हणाले, “काल टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने अभिनेत्याच्या घरी पोहोचले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले तर केवळ रडायचेच बाकी होते. बॉलिवूड, हॉलिवूड आणि उद्योगपतींवर गोळ्या चालल्या की यांना प्रचंड काळजी वाटते, त्यांना झेड प्लस (Z+) सुरक्षा देण्याच्या चर्चा सुरू होतात.” “दुसऱ्या बाजूला स्वतः एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरासमोर राजकीय कार्यकर्ते प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली. मात्र, ठाण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री असूनही शिंदे पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करायला गेले नाहीत. या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी गटाच्या स्थानिक नेत्यांसोबत उघडपणे दिसत आहेत. आरोपींना वाचवण्याचे काम गृहखाते करत असल्यामुळेच मुख्य आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.”
राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढताना ते म्हणाले, “महाराष्ट्राला एक पूर्णवेळ आणि सक्षम गृहमंत्री हवा आहे, अशी मागणी आम्ही सातत्याने करतोय. मात्र, गृहखात्याचा वापर गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी न होता केवळ राजकीय विरोधकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्यासाठी आणि तुरुंगात डांबण्यासाठी केला जात आहे. त्यामुळेच माफिया टोळ्यांना कायद्याची किंवा पोलिसांची कोणतीही भीती उरलेली नाही.” “राज्यातील रोजच्या हत्या आणि गोळीबारावर जाब विचारला की मुख्यमंत्री 40 आणि 50 वर्षे जुना इतिहास काढून विरोधकांकडे बोट दाखवतात. मोदी अजूनही नेहरूंच्या काळात आणि अमित शाह राजीव गांधींच्या काळात अडकले आहेत. केंद्रात 12 वर्षे तुमची सत्ता आहे, महाराष्ट्रात 5 वर्षे तुमची सत्ता आहे; मग तुम्ही काय करत आहात? काल झालेल्या हत्यांवर बोलायचे सोडून 50 वर्षांपूर्वीचा पाढा वाचणे म्हणजे मेंदूला बधिरता आल्याचे लक्षण आहे.”



