
जळगाव : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत विविध शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उपक्रमांतर्गत आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, बळीराम पेठ येथे गणेश फेस्टिवल पोस्टल नाईट कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला गणेशभक्त व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या अंटार्क्टिका खंडावरील महत्वपूर्ण मोहिमेचा एक भाग असलेल्या ‘ऑपरेशन गंगोत्री’ या भव्य आरास परिसरात दि. २१ सप्टेंबर रोजी या कॅम्पचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘लोकसंवाद’ साधत पोस्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
कॅम्पच्या शुभारंभप्रसंगी आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आश्विन भोळे, पदाधिकारी राहुल घोरपडे, रुपेश पाटील, विपीन पवार, मयूर विरपनकर, नितीन चंदनकर, ‘प्रबोध चंद्रिका’चे संपादक कमलाकर फडणीस, प्रसाद जोशी आदी उपस्थित होते.
पोस्ट विभागामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या कल्याणकारी आर्थिक बचत योजना, ‘माय स्टॅम्प’ यासह विविध जुन्या व नवीन योजनांची माहिती गणेशभक्त, नागरिक व मंडळाच्या सदस्यांना देण्यात आली. यावेळी पोस्टल लाइफ इन्शुरन्स, मासिक बचत योजना, बचत खाते, पार्सल सेवा आदी विविध पोस्टल योजनांची माहिती पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे नागरिकांना देण्यात आली. योजनांचे महत्त्व समजावून सांगण्याबरोबरच माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले.
गणेश फेस्टिवलच्या निमित्ताने शहरातील विविध गणेश मंडळांच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पोस्टल नाईट कॅम्पच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधून पोस्ट विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हेड पोस्ट ऑफिसचे एस. व्ही. मुंढे, वैभव तायडे व ग्यानोद्दिन तडवी यांनी परिश्रम घेतले.



