
पाचोरा : प्रतिनिधी
शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या १५ वर्षांपासून प्रामाणिकपणे फुलांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला गोशाळेचा बहाणा, शासकीय नोकरीचे आमिष आणि पालिकेच्या ठेकेदारीत दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ११ लाख ८३ हजारांची रोख व ऑनलाईन रक्कम तसेच १२ लाखांची ‘इनोवा क्रिस्टा’ कार असा एकूण २४ लाख ३३ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना पाचोरा शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या फुल व्यावसायिकाच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात तालुक्यातील बिल्दी बुद्रुक येथील श्याम श्रीराम जाधव (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. श्याम जाधव हे आपल्या आई आणि भावासोबत वास्तव्यास असून, छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते फुल विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा गाडा हाकतात. याच चौकात कपड्याचे दुकान असलेला आणि पाचोऱ्यातील तलाठी कॉलनीत राहणारा जितेंद्र महारू अहिरे हा नेहमी त्यांच्या फुलांच्या दुकानावर येत असे. यातूनच त्यांची घट्ट मैत्री झाली. दरम्यान, जितेंद्र अहिरे याने पाचोरा परिसरात गोशाळा टाकण्यासाठी जमिनीची आवश्यकता असल्याचे सांगून फिर्यादीची बिल्दी येथील जमीन पसंत केली. गोशाळेला शासकीय मान्यता मिळवून देत फिर्यादीला तेथे नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून त्याने पूर्ण विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांचा मामेभाऊ राजीव शिवाजी वाघ (रा. चाळीसगाव) हा चाळीसगाव पालिकेत असून ठेके चालवण्यासाठी त्याला पैशांची गरज आहे. तुम्ही २० लाख दिल्यास तो दुप्पट पैसे परत करेल, अशी बतावणी करत अहिरे याने बनाव रचला. दरम्यान, संशयितांच्या जाळ्यात फसल्याने श्याम जाधव याने २३ जानेवारी २०२३ रोजी रोख ४ लाख रुपये, १५ मे २०२४ रोजी बँक खात्यात ५० हजार रुपये, असे वेळोवेळी रोख व ऑनलाईन माध्यमातून एकूण ११ लाख ८३ हजार रुपये दिले. एवढ्यावरच न थांबता, १४ नोव्हेंबर २०२४ रोजी नातेवाईकाच्या लग्नाला जायचे आहे, असे खोटे सांगून अहिरे याने जाधव यांची १२ लाखांची पांढऱ्या रंगाची इनोवा क्रिस्टा कार (एमएच ४८, बीएच- ८६००) ही चोरुन नेली. दरम्यान, सराईत भामट्याच्या या कृत्यामुळे पाचोरा शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पैसे आणि कार वारंवार मागूनही जितेंद्र अहिरे हा केवळ उडवाउडवीची उत्तरे व खोटी आश्वासने देत होता. अखेर आपली आर्थिक आणि मानसिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी श्याम जाधव यांनी १७ सप्टेंबरला पाचोरा पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पो. नि. राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करत आहेत.



