
अमरावती : वृत्तसंस्था
गोरे होण्यासाठी स्वतःवरच औषधोपचार करणे एका 22 वर्षीय शिकाऊ डॉक्टरच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आदित्य रावटे असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. आदित्यने नुकतीच नाशिक येथून बीएएमएसची पदवी पूर्ण केली होती. त्यानंतर तो अमरावतीतील एका रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होता. त्याला लहानपणापासून अपस्माराचा आजार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आदित्यला त्वचेचा रंग उजळ करण्यासाठी काही औषधे आणि इंजेक्शन घेण्याची सवय होती. यापूर्वीही त्याने अशा प्रकारचे इंजेक्शन घेतले होते. त्यावेळी त्याला अपेक्षित परिणाम मिळाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे काही काळाने तो पुन्हा अशाच प्रकारचे इंजेक्शन घेत असल्याचे सांगण्यात आले.
घटनेच्या दोन दिवस आधी रात्री आदित्य घरी आला. जेवण केल्यानंतर त्याने सलाईनद्वारे इंजेक्शन घेतल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर तो झोपी गेला. मात्र, सकाळी तो हालचाल करत नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूनंतर आदित्यच्या शरीराच्या रंगातही बदल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे औषध अथवा इंजेक्शनचा प्रमाणापेक्षा जास्त डोस घेतल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी आदित्यचा मृत्यू श्वासावरोध आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, औषधांच्या ओव्हरडोसचा मृत्यूशी संबंध आहे का, हे वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. वलगाव पोलिस ठाण्याच्या ठाणेदार रीता उईके यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत्यूमागील नेमके वैद्यकीय कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन अहवाल आणि आवश्यक वैद्यकीय तपासण्यांचे निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत.
गोरे होण्यासाठी औषधे किंवा इंजेक्शन स्वतःच्या मनाने घेणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून समोर आले आहे. मात्र, आदित्यचा मृत्यू नेमका औषधांच्या ओव्हरडोसनेच झाला का, याबाबत अधिकृत वैद्यकीय अहवालानंतरच निष्कर्ष स्पष्ट होईल.



