
चोपड्यातील कथित सूत्रधाराची चौकशी करण्याची मागणी
विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जिल्ह्यात शासकीय रेशन धान्याच्या कथित काळाबाजाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, या गैरव्यवहारामागे जिल्हाभरात कार्यरत असलेल्या एका कथित सिंडिकेटची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. चोपडा येथील वाणी यांचा या व्यवहारांशी संबंध असल्याचा आरोप एका तक्रारीत करण्यात आला आहे.
चोपडा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, पारोळा, धरणगाव, जामनेर, फत्तेपूर, रावेर, यावल आदी भागांमध्ये रेशन धान्याच्या कथित गैरव्यवहाराचे जाळे असल्याचा दावा करण्यात आला आहे. विविध ठिकाणी रेशन धान्याची खरेदी करून ते अन्यत्र वडवली जात असल्याचे चर्चा आहे
विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर तसेच अलीकडील भडगाव परिसरातील कारवाईच्या पार्श्वभूमीवर या कथित नेटवर्कची व्याप्ती तपासण्याची मागणी होत आहे. यापूर्वीही जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जामनेर आणि भडगाव तालुक्यांतील रेशन तांदळाच्या कथित काळाबाजाराची चौकशी करण्याची मागणी आहे.
दरम्यान, ऑगस्टमध्ये पारोळा येथे कोंबड्यांच्या खाद्याच्या नावाखाली रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारात नेल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे वृत्त असून, सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
‘मास्टरमाइंड’ कोण? चौकशीची गरज
चोपड्यातील मास्टर माईंड वाणी या कथित व्यवहारातील प्रमुख व्यक्ती असल्याची चर्चा आहे तसेच छत्रपती संभाजीनगर येथील गजानन अॅग्रो संदर्भातील कथित प्रकरणातील एका व्यक्तीशी त्यांचे व्यावसायिक अथवा वैयक्तिक संबंध असल्याचाही दावा करण्यात आला आहे. या सर्व बाबींची तपास यंत्रणांनी स्वतंत्रपणे पडताळणी करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संबंधित व्यक्तीशी वाणी यांचे जवळचे संबंध असल्याचा चर्चा आहे. या कथित संबंधांमुळे कारवाईपासून संरक्षण मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांना कोणताही अधिकृत पुरावा किंवा संबंधित अधिकाऱ्यांची बाजू उपलब्ध नसल्याने त्यांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे.
रेशनच्या हक्काच्या धान्यावर डल्ला; प्रशासनासमोर आव्हान
रेशनच्या धान्याचा काळाबाजार हा थेट गरीब आणि गरजू लाभार्थ्यांच्या हक्कावर परिणाम करणारा प्रकार आहे. जळगाव जिल्ह्यात लाभार्थ्यांना त्यांच्या मंजूर धान्याची माहिती SMS द्वारे मिळण्याची व्यवस्था करण्यात आली असून, पावती घेऊन प्रत्यक्ष मिळालेले धान्य आणि संदेशातील प्रमाण तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्यामुळे चोपड्यातील कथित सूत्रधारापासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या कथित रेशन सिंडिकेटपर्यंत संपूर्ण साखळीची अन्न व नागरी पुरवठा विभाग, महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. चौकशीत आरोप तथ्यहीन आढळल्यास तेही स्पष्ट व्हावे आणि गैरव्यवहार सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



