
जळगाव : प्रतिनिधी
आगामी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी गावकरी तसेच गुराढोरांच्या पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात आरक्षित ठेवावे, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख शिवराज भाऊ पाटील व विजय लाड यांनी केली आहे.
याबाबत आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. धानवड चिंचोली परिसरात उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शेतीसाठी किंवा इतर कारणांसाठी पाण्याचा वापर होत असताना गावकरी आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी धरणातील काही पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
“आगामी दुष्काळात गावातील नागरिक आणि गुराढोरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणातील पाण्याचे आतापासूनच योग्य नियोजन करून पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक साठा राखीव ठेवावा,” अशी भूमिका शिवराज भाऊ पाटील व विजय लाड यांनी मांडली.
तसेच प्रशासनाने पाणीसाठ्याचा आढावा घेऊन गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्यावे आणि दुष्काळाच्या काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
गावकरी व पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.



