जळगाव : प्रतिनिधी
‘मैत्री ठेवली नाही तर तुला आणि तुझ्या परिवाराला ठार मारेन’ अशी धमकी देत तरुणाने मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर जोरदार धिंगाणा घातला. इतकेच नाही तर, रागाच्या भरात त्याने तरुणीची गाडी समजून इमारतीखाली उभ्या असलेल्या दुसऱ्याच एका व्यक्तीच्या कारची तोडफोड केल्याचा प्रकार जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील डेमला कॉलनी परिसरातील एका २१ वर्षीय तक्रारदार तरुणी आणि २३ वर्षीय तरुण मागील एका वर्षापासून मित्र होते. मात्र, काही कारणास्तव तरुणीला तरुणासोबतची मैत्री पुढे चालू ठेवायची नव्हती. तिने मैत्री तोडल्याचा तरुणाला राग आला. याच रागातून तरुणाने दि. १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा ते दोन वाजेच्या सुमारास थेट तरुणीच्या घरासमोर जाऊन आरडाओरड करण्यास सुरुवात केली. ‘तू माझ्याशी मैत्री ठेवली नाही तर तुला व तुझ्या परिवाराला ठार मारेल’ अशी धमकी देत त्याने तरुणीला अश्लील शिवीगाळ केली.
संतापाच्या भरात त्याने इमारतीखाली उभी असलेली (एम.एच ०३ सी.एम ९४९९) क्रमांकाची ही तरुणीचीच आहे असा गैरसमज करून घेतला आणि त्या गाडीची तोडफोड करून नुकसान केले. अखेर घाबरलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून १९ ऑगस्ट रोजी रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि गोपाल देशमुख हे करीत आहेत.



