शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई; उपचाराचे साहित्य व औषधी जप्त, संशयित ताब्यात
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणताही वैद्यकीय परवाना अथवा संबंधित पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या संशयित बोगस डॉक्टरवर पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. परीविक्षाधीन उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांच्या पथकाने बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक व्यक्ती कोणताही वैद्यकीय परवाना किंवा मान्यताप्राप्त पदवी नसताना रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर परीविक्षाधीन उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांनी संबंधित ठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलिसांच्या पथकाने बुधवार रात्री सापळा रचला. रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास संशयित व्यक्ती रुग्णांवर उपचार करीत असल्याची खात्री झाल्यानंतर पथकाने अचानक छापा टाकला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत त्याला शनिपेठ पोलीस ठाण्यात आणले.
उपचाराचे साहित्य, औषधी जप्त
छाप्यादरम्यान संशयिताच्या ठिकाणाहून रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य तसेच विविध औषधी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली पदवी अथवा परवाना आहे का, याचीही पोलिसांकडून तपासणी करण्यात आली.
दरम्यान, कोणतीही वैद्यकीय पात्रता किंवा परवाना नसताना रुग्णांवर उपचार केल्याचा संशय असल्याने पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अचानक छाप्याने परिसरात खळबळ
पोलिसांच्या पथकाने अचानक कारवाई केल्याने संबंधित परिसरात काही काळ खळबळ उडाली. बोगस डॉक्टरांमार्फत रुग्णांच्या जीविताशी खेळ केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.



