शालार्थ घोटाळ्यात जळगाव ‘हॉटस्पॉट’; ८४९ शिक्षक-कर्मचारी तपासाच्या रडारवर
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या सुमारे १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात जळगाव जिल्ह्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील तब्बल ६६ शिक्षण संस्थांचा समावेश असल्याचे तपास यंत्रणेच्या दोषारोपपत्रातून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने सुमारे ११ हजार पानांचे दोषारोपपत्र नाशिक रोड न्यायालयात दाखल केले आहे. दोषारोपपत्रात राज्यातील एकूण १११ शिक्षण संस्थांचा उल्लेख असून, त्यापैकी ६६ संस्था जळगाव जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, प्रकरणातील एकूण १,१९९ संशयितांपैकी ८४९ जण जळगाव जिल्ह्याशी संबंधित आहेत. यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष आणि सचिव यांचा समावेश असल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात जळगावमधील भाजप नेते संजय गरुड यांचेही नाव समोर आले आहे. त्यामुळे शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रकरणातील १५ संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर तपासाला वेग आला आहे.
दरम्यान, या गुन्ह्यात संशयित असलेले आणि तत्कालीन शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले नितीन उपासनी यांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर आज, मंगळवारी सुनावणी होणार आहे.
तर, भाजप नेते संजय गरुड सध्या सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यातील ८४९ संशयितांचा समावेश असल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आता एसआयटीच्या पुढील तपासात आणखी कोणती नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



