प्रतिनिधी जळगाव : नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली ठेकेदारांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कुंभमेळ्याच्या कामांसाठी बनावट वर्क ऑर्डर तयार करून ठेकेदारांकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणात ४०० ते ५०० कोटी रुपयांच्या बनावट ऑर्डर्सचा दावा करण्यात आला आहे.
कुंभमेळ्याची कामे ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होत असताना काही व्यक्तींनी नाशिक महापालिका आणि कुंभमेळा प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील काही ठेकेदारांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर या प्रकरणातील संशयितांचे ‘जामनेर कनेक्शन’ असल्याचा दावा पुढे आला आहे.
महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील दोन, जळगावचा एक आणि धुळ्याशी संबंधित एका व्यक्तीचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बनावट वर्क ऑर्डरच्या माध्यमातून ठेकेदारांकडून पैसे घेतल्याचेही तक्रारदारांनी सांगितल्याचे महाजन यांनी म्हटले.
विशेष म्हणजे, काही बनावट कागदपत्रांमध्ये आवश्यक असलेल्या QR कोडबाबतही प्रश्न उपस्थित झाले, त्यामुळे ठेकेदारांना कागदपत्रांच्या सत्यतेबाबत संशय आला आणि प्रकार समोर आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, नाशिक कुंभमेळ्याच्या नावाने बनावट वर्क ऑर्डरचा प्रकार यापूर्वीही समोर आला आहे. एप्रिल २०२६ मध्ये नाशिकमध्ये विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बनावट डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून ₹३५ कोटींच्या दोन बनावट वर्क ऑर्डर तयार केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
आता ४०० ते ५०० कोटींच्या बनावट ऑर्डर्सचा दावा आणि जामनेर कनेक्शनच्या आरोपांमुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.
**खरंच किती कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर वाटल्या? कोण आहेत या रॅकेटमागचे चेहरे? आणि जामनेर कनेक्शन नेमकं काय? याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.**



