सहा दिवसांच्या संसारावर काळाचा घाला… माहेरी निघालेल्या नववधूचा भीषण अपघातात मृत्यू; आनंदाचे घर क्षणात शोकसागरात
जळगाव | प्रतिनिधी
हातावरील मेंदीचा रंग अजूनही फिका झाला नव्हता… लग्नातील मंगलाष्टकांचे स्वर कानात घुमत होते… नव्या संसाराची असंख्य स्वप्ने डोळ्यांत घेऊन सासरी आलेली नववधू माहेरी जाण्यासाठी निघाली; पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. अवघ्या सहा दिवसांच्या संसारावर काळाने घाला घालत २१ वर्षीय नवविवाहितेचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत नवविवाहितेचे नाव वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) असे आहे. त्यांचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील देवराम नगर परिसरात राहणारे पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडला होता. लग्नानंतर नवदांपत्याने देवदर्शन करून नव्या आयुष्याची सुरुवात केली होती.
सोमवारी वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका जळगाव येथे आले होते. दुपारचे जेवण आटोपल्यानंतर दोघे दुचाकीवरून कोळपिंप्रीकडे निघाले. मात्र दुपारी सुमारे चारच्या सुमारास विद्यापीठासमोरील रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. काही दिवसांपूर्वीच लेकीला सासरी आनंदाने निरोप देणाऱ्या आई-वडिलांवर आज तिचाच निर्जीव देह पाहण्याची वेळ आली. नव्या संसाराची स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त झाली आणि आनंदाने नटलेले घर क्षणार्धात शोकसागरात बुडाले. रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले.
या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अपघातास कारणीभूत असलेल्या वाहनाचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.



