जामनेर : प्रतिनिधी
जामनेर तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या ताब्यातील शासकीय वाहनाला तालुका कृषी कार्यालयाच्या आवारातच मध्यरात्री आग लागल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १८) पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आग अपघाती होती की कोणीतरी मुद्दाम लावली, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १५ एए १८० या क्रमांकाचे शासकीय वाहन हे तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या ताब्यात असून, दि. १७ रोजी सायंकाळी वाहनचालकाने नेहमीप्रमाणे ते तालुका कृषी कार्यालयाच्या आवारात उभे केले होते. रात्री सर्व कामकाज आटोपल्यानंतर कार्यालय परिसर शांत होता. दरम्यान, पहाटेच्या सुमारास पाचोरा रोड परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना कृषी कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनातून धूर आणि ज्वाळा निघताना दिसल्या. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांना घटनेची माहिती दिली.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. घटनेनंतर पोलीस आणि कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीत वाहन ज्या ठिकाणी सायंकाळी उभे करण्यात आले होते, त्याच ठिकाणी जळाल्याचे दिसून आले. त्यामुळे आग तांत्रिक बिघाडामुळे लागली की कोणीतरी मुद्दाम घातपात केला, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या घटनेशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या आधारे काही संशयितांची माहिती समोर येत असल्याची चर्चा असून, पोलीस त्याची सत्यता पडताळून पाहत आहेत. संबंधित संशयितांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी दिली.
या प्रकरणी सहाय्यक अधीक्षक अजय मनवर यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, आगीमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.



