जळगाव : प्रतिनिधी
शहरातील श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या शैक्षणिक संस्थेत तब्बल ४ कोटी ८५ लाख ३ हजार ५८२ रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी भरलेले शैक्षणिक शुल्क तसेच संस्थेच्या नावे आलेले धनादेश संस्थेच्या बँक खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याप्रकरणी संस्थेचा लेखापाल लोकेश उर्फ चेतन गणेश कोल्हे (रा. नशिराबाद) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या शिरसोली रोडवरील महाविद्यालयात लोकेश कोल्हे हा लेखापाल म्हणून कार्यरत होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२० ते ३१ मे २०२३ या कालावधीत त्याने विद्यार्थ्यांनी शुल्कापोटी भरलेली रक्कम तसेच संस्थेच्या नावे आलेले धनादेश वटवून त्यातून प्राप्त झालेली रक्कम संस्थेच्या अधिकृत खात्यात जमा केली नाही.
या रकमांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून संस्थेची तब्बल ४ कोटी ८५ लाख ३ हजार ५८२ रुपयांची फसवणूक व अपहार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आर्थिक व्यवहारातील तफावत लक्षात आल्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली.
दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज सादर केला होता. या अर्जाच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आर्थिक गैरव्यवहार आणि अपहार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला.
त्यानंतर गुलाबराव देवकर यांनी मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून लेखापाल लोकेश उर्फ चेतन गणेश कोल्हे याच्याविरुद्ध अपहार आणि विश्वासघातासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिस निरीक्षक बबन आव्हाड आणि सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड यांनी महाविद्यालयाच्या कार्यालयाला भेट देत या प्रकरणाची माहिती घेतली. तसेच तपासासाठी आवश्यक असलेले आर्थिक व्यवहारांचे दस्ताऐवज, पावत्या आणि इतर नोंदी ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत आहेत.



