जळगाव : प्रतिनिधी
आसोदा रेल्वेपुलाखाली पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या विक्की ऊर्फ छोटा माया गणेश शिंदे (२२, मूळ रा. चौगुले प्लॉट, ह. मु कुसुंबा, ता. जळगाव) याच्यासह तलवार घेऊन फिरणाऱ्या अल्पवयीन मुलावर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करीत शस्त्र जप्त केले. ही कारवाई १४ जून रोजी करण्यात आली. या प्रकरणी या दोघांसह शस्त्र विक्री करणारा ज्ञानेश्वर ऊर्फ नन्या हडकर/काळनोर (ऊर्फ हटकर ऊर्फ गवळी), रा. तांबापुरा याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली.
यातील विक्की शिंदे हा १३ जून रोजीच कारागृहातून बाहेर पडला व पुन्हा तो शस्त्रासह हाती लागला. शनिपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी साजिद मन्सुरी यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यासह पोकॉ. पराग दुसाने व अमोल वंजारी हे आसोदा रेल्वेपुलाखाली पोहोचले. त्यांना पाहून दोघांनी पळ काढला. मात्र, पथकाने पाठलाग करून त्यांना पकडले. त्या वेळी विक्की शिंदे याच्याकडे गावठी पिस्तूल व अल्पवयीन मुलाकडे तलवार आढळली.
ही शस्त्रे ही ज्ञानेश्वर हडकर याच्याकडून घेतल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले. पिस्तूल १० हजार तर तलवार दोन हजारात घेतल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात विक्की शिंदे, ज्ञानेश्वर हडकर व १७ वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.



