चोपडा : प्रतिनिधी
शहरातील मेन रोडवरील गोल्ड हाऊस महावीर ब्रदर्स या सराफा दुकानातून तब्बल ६ लाख ४८ हजार रुपयांचे ८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लेडीज पेंडल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दुकान मालक महावीर उमेदमल जैन यांनी चोपडा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, ९ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्ती दुकानात आले होते. त्यांनी विविध प्रकारचे सोन्याचे दागिने पाहण्याच्या बहाण्याने कर्मचाऱ्याकडून अनेक डिझाईनचे पेंडल मागवून घेतले. या वेळी त्यांनी कर्मचाऱ्याचे लक्ष विचलित करत गोंधळाचे वातावरण निर्माण केले. दरम्यान, काही वेळानंतर संबंधित व्यक्ती दुकानातून निघून गेले. त्यानंतर कर्मचाऱ्याने पेंडलच्या बॉक्सची तपासणी केली असता वजनात सुमारे ४८ ग्रॅमची तफावत आढळून आली. पुढील पडताळणीत बॉक्समधील १५ प्लास्टिक पाकिटांपैकी एक पाकीट गायब असल्याचे समोर आले. दरम्यान, चोरीस गेलेल्या पाकिटात प्रत्येकी सुमारे ३ ग्रॅम वजनाची एकूण २१ सोन्याचे लेडीज पेंडल असे एकूण ८१ ग्रॅम वजनाचे सोने असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करत आहेत



