जळगाव : प्रतिनिधी
शहरातील वाघ नगर भागात १ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास एका घरासमोर लघुशंका केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून २० वर्षीय तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. यातील जखमी तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणावर सुरुवातीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर संबंधित तरुणाला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल संतोष वाघोदे (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात फिर्यादी हर्षल संतोष घुगे (वय २०, रा. समता नगर, जळगाव) याने तक्रार दिली. फिर्यादीतील माहितीनुसार, १ जून रोजी तो आणि त्याचे मित्र राहुल वाघोदे व नितीन सैनी हे त्यांचा मित्र सुमित लोखंडे याच्याकडे जेवणासाठी गेले होते. जेवणापूर्वी सर्वांनी कोल्हे हिल्स परिसरातील टेकडीवरील मोकळ्या जागेत केले. एकत्र बसून मद्यपान राहुल वाघोदे याने अतिप्रमाणात दारू पिल्यामुळे सुमित लोखंडे याने सर्वांना शकुंतला अपार्टमेंटच्या मागे असलेल्या त्याच्या घरी विश्रांतीसाठी नेले. आणि या घराजवळच ही घटना घडली.
दुपारी ४.०० ते ४.३० च्या सुमारास राहुल वाघोदे हा घराबाहेर आला आणि सुमितच्या घरासमोर लघुशंका करू लागला. हे पाहून सुमितच्या घरात राहणारी त्याची मैत्रीण हिने राहुलला शिवीगाळ केली. त्यानंतर सुमितनेही बाहेर येऊन राहुलला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी हर्षल आणि त्याचे मित्र हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच मैत्रीण रागात घरात गेली . तिने घरातून एक धारदार चाकू आणला आणि राहुलच्या २ छातीत व पोटाच्या मध्यभागी जोरात खुपसला होता. त्यानंतर राहुलच्या मित्रांनी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर राहुलला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना, ३ जून रोजी त्याचा मृत्यू झाला.
तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या सुमित व तरुणी या दोघांच्या शोधात पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय देवराम पाटील हे करत आहेत. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात सुमित लोखंडे व एका तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



