धरणगाव प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या प्रवासी गाड्यांना अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी जोरदार मागणी जिल्हा परिषद व स्थायी समिती सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भारतीय रेल्वे, भुसावळ विभाग यांना सविस्तर निवेदन सादर केले.
पाळधी हे धरणगाव तालुक्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि रुग्ण मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवेवर अवलंबून आहेत. मात्र अनेक महत्त्वाच्या गाड्यांना येथे थांबा नसल्याने प्रवाशांना भुसावळ किंवा जळगाव गाठावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
विशेषतः शिक्षण, व्यवसाय, कृषी व्यवहार आणि उपचारांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता पाळधी स्टेशनवर काही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देणे अत्यावश्यक असल्याचे प्रतापराव पाटील यांनी स्पष्ट केले.
या गाड्यांना थांबा देण्याची मागणी
▪️ गाडी क्र. १२१११ – सूरत – अमरावती एक्सप्रेस
▪️ गाडी क्र. १९००७ – सूरत – भुसावळ एक्सप्रेस
▪️ गाडी क्र. १९००३ – खान्देश एक्सप्रेस (वांद्रा टर्मिनस – भुसावळ)
प्रतापराव पाटील यांनी म्हटले आहे की, या गाड्यांना पाळधी येथे थांबा मिळाल्यास हजारो प्रवाशांची मोठी सोय होईल. विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार असून स्थानिक आर्थिक आणि व्यापारी विकासालाही चालना मिळेल.
लोकहिताचा विचार करून रेल्वे प्रशासनाने पाळधी रेल्वे स्टेशनवर वरील गाड्यांना तातडीने अधिकृत थांबा मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.



