पाळधी (ता. जळगाव) : येथील स. ना. झवर विद्यालयातील शालेय पोषण आहार योजनेत गंभीर अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या पोषण आहारात अपहार व निष्काळजीपणाचा संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यालयात अचानक तपासणी केली. यावेळी ऑनलाईन नोंदींमध्ये पोषण आहाराचा साठा शून्य दाखविण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष पाहणीदरम्यान शाळेच्या परिसरात पोषण आहारासाठी वापरण्यात येणारे धान्य तसेच अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. ऑनलाईन नोंदी आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आल्याने संशय अधिकच बळावला आहे.
तपासणीदरम्यान पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या हळद व मिरचीसह काही साहित्याची मुदत संपलेली असल्याचेही आढळून आले. विद्यार्थ्यांना अशा साहित्यापासून तयार करण्यात आलेला आहार दिला गेला असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ झाल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे.
याशिवाय शाळेतील स्वयंपाकगृहाची स्थितीही अत्यंत अस्वच्छ असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले. प्राथमिक निष्कर्षांनंतर संबंधित खोली सील करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्याध्यापक संजय पाटील तपासणीवेळी गैरहजर असल्याने संपूर्ण पंचनामा होऊ शकला नाही. त्यामुळे सोमवारी त्यांची उपस्थिती घेऊन अधिकृत पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकारामुळे गटविकास अधिकारी आणि संबंधित प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतक्या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष कसे झाले, याबाबत चर्चा सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे पालकांसह सर्वांचे लक्ष लागून आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते, हे आता महत्त्वाचे ठरणार आहे.



