जळगाव : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती असलेल्या एम. जे. कॉलेज परिसरात आज पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तीन कॅफेंवर अचानक छापे टाकले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, इतर कॅफे चालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. परिसरातील काही कॅफेंमध्ये नियमबाह्य प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आणि संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी विशेष पथक तयार केले होते.
या पथकामध्ये पोलीस कर्मचारी आवेश शेख, प्रणय पवार आणि अमोल ठाकूर यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेले ‘दामिनी पथक’ देखील या कारवाईत सहभागी झाले होते. त्यामुळे कॅफेंमध्ये सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असल्याचे दिसून आले.
महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असल्याने कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांकडून ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तिन्ही कॅफेंची कसून तपासणी केली असून, काही बाबींची पडताळणी सुरू आहे. संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



