पाचोरा : प्रतिनिधी
शहरातील जवाहर हौसिंग सोसायटीमधील आनंद नथ्थू भोई (वय ३४) या तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २९ रोजी सकाळी ११ वाजेपूर्वी घडली. शहरात यंदा उन्हाळ्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नथ्थू भोई हे दररोज छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी भाजी विक्री करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे आजही ते आपल्या दुकानावर भाजी विक्रीसाठी आले होते. मात्र, सकाळी १० वाजेनंतर अचानक त्यांना चक्कर आली अन् ते दुकानावर असतानाच कोसळले. ही बाब परिसरातील दुकानदारांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेत आनंद भोई यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन यानिमित्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



