एरंडोल : प्रतिनिधी
एरंडोल तालुक्यातील भालगाव फाट्यानजीक आज सकाळी भरधाव वेगातील एसटी बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरील दुभाजकावर आदळली. या अपघातात बसमधील एकूण १८ जण जखमी झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याहून भुसावळकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस (एमएच-२०, बीएल-३४१२) आज सकाळच्या सुमारास भालगाव फाट्याजवळून जात असताना हा अपघात घडला. बस भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण अचानक सुटले आणि बस थेट रस्त्यालगतच्या दुभाजकावर आदळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये १५ प्रवासी, चालक, वाहक आणि राज्य परिवहन महामंडळाचा एक कर्मचारी असे एकूण १८ जण प्रवास करत होते. धडकेनंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवाशांना किरकोळ तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बसवरील नियंत्रण अचानक सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, रस्त्याचे सुरू असलेले काम, दुभाजकाची रचना, तसेच चालकांवर असलेला कामाचा ताण या बाबींचाही या अपघातामागे संबंध असू शकतो, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
दरम्यान, अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्याने संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.



