जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवकॉलनी ते आशाबाबा नगर मार्गावर रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने सोमवारी सकाळी परिसरात एकच खळबळ उडाली. चेहऱ्यावर गंभीर जखमा असल्यामुळे सुरुवातीला घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात अतिमद्यसेवनानंतर तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वर बारकू नारळे (वय २७, रा. खंडेराव नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर नारळे हा आपल्या आई-वडिलांसह खंडेराव नगर परिसरात राहत होता. काही वर्षांपासून तो बाहेरगावी नातेवाईकांकडे वास्तव्यास होता. दोन दिवसांपूर्वीच तो आई-वडिलांना भेटण्यासाठी जळगाव येथे आला होता. रविवारी रात्री त्याने मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केले होते. त्यानंतर तो शिवकॉलनीकडून आशाबाबा नगरच्या दिशेने पायी जात असताना रस्त्याच्या कडेला त्याचा तोल गेला. तोंडावर जोरात पडल्याने त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. परिसरात अंधार असल्याने आणि रात्री उशिराची वेळ असल्याने तो रात्रभर तेथेच पडून राहिला. गंभीर जखम व रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोमवारी सकाळी नागरिकांना रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ अवस्थेत एक व्यक्ती पडलेली दिसली. त्यांनी तात्काळ रामानंद नगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. चेहऱ्यावर गंभीर जखमा असल्याने सुरुवातीला पोलिसांनी घातपाताच्या शक्यतेने तपास सुरू केला.
दरम्यान, मृतदेह आढळल्याची माहिती परिसरात पसरताच मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी मृताची ओळख ज्ञानेश्वर नारळे अशी पटवून दिली. त्यानंतर त्याचे आई-वडील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ओळख निश्चित केली. मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिस तपासात ज्ञानेश्वरला मद्याचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. अतिमद्यसेवनामुळे चालताना त्याचा तोल गेला आणि तो तोंडावर कोसळला. पडताना दोन्ही हात अंगाखाली अडकल्याने त्याला उठता आले नसावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मात्र, मृताच्या चेहऱ्यावरील जखमा पाहून त्याचे मामा रवी मोरे यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे खंडेराव नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून मद्याच्या व्यसनामुळे आणखी एका तरुणाचा जीव गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.



