जळगाव : प्रतिनिधी
कुटुंबीय लग्नासाठी बाहेरगावी गेले असताना बंद घराला लक्ष्य करत चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ९ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २८ एप्रिल रोजी समोर आली असून शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले संतोष श्यामलाल आटवाल (वय ४०, रा. गुरुनानक नगर) यांच्या मामेभावाचे लग्न मालेगाव येथे असल्याने आटवाल कुटुंब २६ एप्रिल रोजी घर बंद करून लग्नासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला. चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील ५ तोळे वजनाची सोन्याची चेन, ५ तोळ्याचे ब्रेसलेट, अडीच तोळ्याचे नेकलेस व झुमके, तसेच अडीच तोळ्याचे आणखी एक ब्रेसलेट असे एकूण १५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख ४० हजार रुपये असा ऐवज चोरून नेला.
विशेष म्हणजे, आटवाल यांच्या घराला दोन दरवाजे असून त्यांनी पुढील दरवाजाला आतून कडी लावली होती, तर मागील दरवाजाला बाहेरून कुलूप लावले होते. मात्र चोरट्यांनी मागील बाजूने प्रवेश करून कुलूप तोडत घरफोडी केली. चोरीस गेलेल्या दागिन्यांची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे २३ लाख रुपये असल्याचे सांगितले जात असले तरी, पोलिसात जुन्या दरानुसार ९ लाख रुपयांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक रवींद्र गायकवाड पुढील तपास करीत आहेत.



