पाचोरा : प्रतिनिधी
शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांविरुद्ध पाचोरा पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. २४ एप्रिल रोजी राबवलेल्या विशेष मोहिमेत २५ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
पाचोरा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. २४ तारखेला सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत शहरातील विविध भागांत पोलिसांनी अचानक छापे टाकले. यावेळी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करताना आढळलेल्या २५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या सर्व संशयितांना पाचोरा पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिस प्रशासनाकडून पूर्ण केली जात आहे. ही कारवाई पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार व त्यांच्या विशेष पथकाने केली. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून नागरिकांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा दिला आहे.



