जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक परिसरात आज सकाळी भीषण आगीची घटना घडली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील कॅन्टींगजवळ असलेल्या स्टोअर रूमला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयातील कॅन्टींगजवळ असलेल्या स्टोअर रूममध्ये अचानक आग लागली. आग लागताच परिसरात धुराचे लोट पसरले आणि तातडीने महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते.
या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तर मनपाच्या अग्निशमन पथकात अधिकारी अश्वदीप घरडे, वाहनचालक देविदास सुरवाडे, अक्षय नाईक, भगवान पाटील, यश मनोरे आणि तेजस जोशी यांचा सहभाग होता. प्राथमिक माहितीनुसार, वाढत्या उन्हामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अधिक तपास सुरू आहे.



