धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वंजारी खपाट येथे महावितरणच्या मुख्य वीजवाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचे उभे मका पीक पूर्णपणे जळून खाक झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून प्रशासनाकडे तातडीने पंचनामा व नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत पुरुषोत्तम शंकर चौधरी (रा. वंजारी खपाट, ता. धरणगाव) यांनी तहसीलदार तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शेतातून जाणाऱ्या महावितरणच्या मुख्य वीजवाहिनीत अचानक शॉर्ट सर्किट झाले. यामुळे ठिणग्या उडून शेतात आग लागली आणि काही क्षणातच संपूर्ण मका पीक जळून गेले.
या आगीत चौधरी यांचे उभे पीक पूर्णतः नष्ट झाले असून, वर्षभराची मेहनत व खर्च वाया गेला आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला या घटनेमुळे मोठा फटका बसला आहे.
चौधरी यांनी प्रशासनाकडे केलेल्या मागण्यांमध्ये तात्काळ महसूल व कृषी विभागाकडून पंचनामा करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे, तसेच शासनाकडून त्वरित आर्थिक मदत किंवा नुकसान भरपाई मंजूर करावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय, महावितरणने परिसरातील जीर्ण व सैल झालेल्या तारांची दुरुस्ती युद्धपातळीवर करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील, अशीही त्यांनी विनंती केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वीजवाहिन्यांच्या देखभालीबाबत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.



