मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे अनुदान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर आता मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार असून 12 ते 15 जूनदरम्यान 1,500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्यांचे मिळून 3,000 रुपये अनेक महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र काही लाभार्थींना केवळ एका महिन्याचाच हप्ता मिळाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याच दरम्यान मे महिन्याच्या हप्त्याबाबत महिलांमध्ये उत्सुकता होती. भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याचा हप्ता 12 ते 15 जून या कालावधीत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे लाखो महिलांना लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे.
दरम्यान, राज्यभरात ई-केवायसी (e-KYC) आणि पात्रतेची पडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. या प्रक्रियेत अनेक लाभार्थी महिलांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे, तर काही महिला योजनेच्या निकषात बसत नसल्याचे आढळून आले. तसेच तांत्रिक कारणांमुळेही अनेक अर्ज प्रलंबित राहिले. यामुळे सुमारे 80 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयानंतर राज्यात राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
विरोधकांच्या टीकेनंतर राज्य सरकारनेही भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पात्र महिलांना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी देण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. गरज भासल्यास ई-केवायसीची विंडो पुन्हा सुरू करण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा एकदा अर्ज आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.



