जळगाव : प्रतिनिधी
समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा जपत माजी जि. प. सदस्य प्रताप पाटील यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी पाळधी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या संदेशाला केंद्रस्थानी ठेवून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सदर शिबिर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत शासकीय विश्रामगृह, पाळधी येथे पार पडणार असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. या सामाजिक उपक्रमात प्रतापराव पाटील मित्र परिवार, GPS मित्र परिवार, विवेकी बाबा युवा मंच, युवासेना जळगाव ग्रामीण तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि शिवसेना जळगाव ग्रामीण यांचे सहकार्य लाभत आहे.
कार्यक्रमाचे आयोजन BM Group, पालधी यांच्या वतीने करण्यात आले असून, समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. सध्याच्या काळात रक्ताची गरज मोठ्या प्रमाणावर भासते, त्यामुळे अशा शिबिरांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. स्थानिक नागरिक, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या शिबिरात सहभागी होऊन समाजकार्याला हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



