जळगाव : प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महत्त्वाची घोषणा केली आहे. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या ‘निवडणूक प्रमुख’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र जारी केले आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या सलग यशामुळे आमदार राजूमामा भोळे यांचा प्रभाव आणि संघटन कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला अधिकाधिक जागांवर विजय मिळवून देण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपवली आहे.
प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत जळगाव महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आमदार भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
निवडणूक प्रमुख म्हणून सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व संघटनांना सोबत घेऊन, समन्वय साधत अथक परिश्रम करण्याची जबाबदारी आता आमदार राजूमामा भोळे यांच्यावर असणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



